शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
प्रहार पक्षाचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अजिंक्य दिलीप बारणे यांनी नुकताच आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच अखेर, त्यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या उपस्थितीत बारणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, शहर युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बारणे यांनी नुकताच आपल्या प्रहारच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली होती. त्यानंतर त्यांची पुढील भूमिका काय असणार किंवा ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचे स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यामुळे त्यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आज त्यांनी अचानक काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या राजकीय वर्तुळात मोठी चक्रे फिरत आहेत. सर्वच पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पक्ष बदल कार्यक्रम सुरुच आहेत. त्यातच आता प्रहारचे निष्ठावंत पदाधिकारी अजिंक्य बारणे यांनीही पंजाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेला उधाण आले.
काँग्रेस हा पक्ष समाजाच्या व राज्याच्या विकासाला महत्त्व देणारा तसेच प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना समजून घेणारा पक्ष आहे. येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवक वर्गाला सोबत घेऊन जोमाने काम करणार आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता कशा प्रकारे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. जर पक्षाने कोणती जबाबदारी दिल्यास ती नक्कीच निष्ठेने पार पाडेल. (अजिंक्य बारणे - वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य)