शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपासून कोरोना रुपी संकटाशी लढताना आपले पारंपारिक उत्सव आपण साजरे करू शकलो नाहीत. आपण सर्वांनी सामर्थ्याने, ऐक्याने, एकोप्याने आणि आत्मविश्वासाने कोरोनाचा सामना केला आणि पुन्हा एकदा आपण आपले पारंपारिक उत्सव साजरे करण्यासाठी आपण सज्ज आहोत. उत्सवांचा राजा दिवाळी ! आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्याच उत्साहाने व जोमाने कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने गुरुवार दि. ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी मनिषा स्मृती निवास,स.नं.१६४,भोईर नगर,चिंचवड पुणे-३३ येथे दिवाळीच्या मंगलमयी पहाटे मन तृप्त करणारी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी मराठी चित्रपट गीतांची सुरेल मेजवानीची “ दिवाळी पहाट ” आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या झेंडा, (मोरया आणि संत तुकाराम चित्रपट फेम) आणि कालवंत यांच्या सदरीकरणात “आली माझ्या घरी ही दिवाळी” भक्तीगीत,भावगीत,मराठी व हिंदी चित्रपट गीतांची सुरेल गीतांचाहा कार्यक्रम सादर केला गेला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथमेश लाड यांनी बासरीवादन करून यमन राग सादर केला. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ‘सूर निरागस हो…’ या गणेशवंदनेने विनल देशमुख यांनी गायनाची सुरुवात केली. यानंतर मधुसूदन ओझा, कल्याणी देशपांडे, विनल देशमुख मानसी घुले – भोईर आणि सार्थक भोसले यांनी वेगवेगळी गाणी गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’.., ‘देहाची तिजोरी’.., ‘कांदा मुळा भाजी’…, ई. अभंगरचना तसेच ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ…’ ‘मोरया चित्रपटाचे शीर्षकगीत, ‘आई भवानी…’ आणि संत तुकाराम चित्रपटातील ‘जगण्याचा पाया…’ हि चित्रपट गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. कल्याणी देशपांडे यांनी ‘सुंदर ते ध्यान…’ ‘भेट लागी जीवा…’, हि अभंगरचना सादर केल्यानंतर ‘आली माझ्या घरी हि दिवाळी…’ हे भावगीत तसेच ‘राज कि बात है…’, हि कव्वाली तसेच प्रसिद्ध पार्श्वगायिका रेश्माजी यांनी गायलेली रचना ‘लंबी जुदाई…’ हे गीत सादर केले. मानसी घुले – भोईर यांनी ‘मोगरा फुलला…’ हे भक्तीगीत सादर केले व त्यानंतर मानसी घुले – भोईर आणि कार्यक्रमाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी ‘प्रितीच झुळ झुळ पाणी…’ आणि मानसी घुले- भोईर आणि विनल देशमुख यांनी ‘सैराट झालं जी…’ हि द्वंद्वगीते सदर केली तर भाऊसाहेब भोईर यांनी ‘मै शायर तो नही…’ हे चित्रपटगीत सादर केले. ‘मधुसूदन ओझा यांनी देवाचिये द्वारी…’ हि अभंगाने गायनाची सुरुवात केली आणि रसिक श्रोत्यांच्या आग्रहास्तव नरेंद्र चंचल यांनी गायलेले ‘यारा ओ यारा…’ हे चित्रपट गीत सादर करून रसिकांचा वन्स मोअर मिळवला. यानंतर सॅक्सोफोन वादक प्रथमेश मोरे यांनी ‘मेरे ढोलना…’ हे गीत सादर केले.
उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या कार्यक्रमात ‘मेरे देश कि धरती…’ हे देशभक्तीपर समूहगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास परिसरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सलग ४ तास हा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाचे निवेदन मधुसूदन ओझा यांनी केले. यावेळी मा. भाऊसाहेब भोईर, श्री हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर, सौ. किरण हर्षवर्धन भोईर, श्री गौरव घुले, सौ. मानसी गौरव घुले -भोईर आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.