विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत
जिल्ह्यात शनिवार व रविवारी विशेष शिबीराचे आयोजन
पुणे, दि.12: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू असून या कार्यक्रमांतर्गत उद्या शनिवार 14 नोव्हेंबर आणि रविवार 14 नोव्हेंबर तसेच शनिवार 27 आणि रविवार 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली आहे.
या कार्यक्रमांतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. विशेष शिबीरांच्या दिवशी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदी कामकाज केले जाणार आहे. सोमवार 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून बुधवार 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरूस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान या बाबींसाठी ठरवून दिलेले नमुने भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) देणे आवश्यक आहे. तसेच या सर्व सुविधा ऑनलाईनरित्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषरहीत करण्याच्यादृष्टीने हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी करावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले आहे.