शबनम न्युज | चऱ्होली
28 नोव्हेंबर श्रीमंत सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांच्या 268 व्या पुण्यतिथी निमित्त च-होली येथे दाभाडे सरकार चौक या ठिकाणी उमाबाई दाभाडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, “श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे यांचे कार्यकर्तृत्व फक्त शौर्य या एका अंगाने न पाहता त्यांची धार्मिकता, शिस्तबद्धपणा, उत्कृष्ठ नियोजन, जातीय सलोखा, शिक्षण प्रेम अशा अनेकांगांनी त्यांचे चरित्र पाहिले तर खरा आणि वस्तुनिष्ठ इतिहास समोर येतो. हिन्दुस्तान प्रसिद्ध राजवंश असलेला दाभाडे घराना एक सत्य आणि आदर्शवादी वर्तनाने कायम जगल्याने छ्त्रपती शिवाजी महाराजांपासुन शाहु महाराजांपर्यंत सर्वांच्या अगदी विश्वासु आणि आप्त अशी त्यांची ओळख निर्माण झाली. आजच्या नव्या पिढीने त्यांचा फक्त पूर्वगौरव न करता समकालातील त्यांची नैतिक मूल्ये आज आत्मसात करणे अभिप्रेत आहे.”
यावेळी नगरसेविका विनया तापकीर नगरसेवक अजित बुर्ड, भोसरी विधानसभा मनसे अध्यक्ष अंकुश तापकीर शिवसेना उपशहर प्रमुख ॲड कुणाल तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ऋषिकेश तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले .
यावेळी ॲड विनय दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सागर दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.सचिन दाभाडे यांनी आभार मानले.