शबनम न्यूज | पुणे (दि.०२ डिसेंबर) :- औद्योगिक क्षेत्रातील रबर,केमिकल अँड पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये अप्रेन्टिस योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल केंद्र सरकारच्या रबर,केमिकल अँड पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे‘बेस्ट ट्रेनिंग पार्टनर’पुरस्कार पुण्यातील यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेला प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार यशस्वी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
सध्या देशभरातील २५ राज्यांमध्ये ७५० कंपन्यांमधून ‘यशस्वी’ संस्थेच्या माध्यमातून सुमारे ७० हजार प्रशिक्षणार्थी ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम होत आहेत.नॅशनल अप्रेन्टिसशिप प्रमोशन स्किम (नॅप्स) या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशातील बेरोजगार युवक-युवतींना प्रत्यक्ष औद्योगिक आस्थापनेत किमान दोन ते तीन वर्ष सलग काम करण्याची संधी मिळते,तसेच या ऑन द जॉब ट्रेनिंग दरम्यान प्रत्येक अप्रेंटिसला दरमहा ठराविक रक्कम विद्यावेतन म्हणून दिली जाते,याशिवाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना केंद्र सरकार मान्यताप्राप्त सेक्टर स्किल कौन्सिलचे प्रमाणपत्र प्राप्त होते.
रबर, केमिकलअँड पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे यशस्वी संस्थेच्या कामाची घेतलेली दखल ही संस्थेतल्या सर्व सदस्यांसाठी प्रेरणादायी बाब असून त्यामुळे आणखी भरीव काम करण्याचा निश्चय दृढ झाला आहे,अशा शब्दांत यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला रुमी छाबरा, अध्यक्ष रबर केमिकल व पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल,शेवानी नागपाल, मुख्य कार्यकारी अधिकारी,रबर केमिकल व पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल,किशोर संपत,अध्यक्ष ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, विनोद सायमन, माजी अध्यक्ष रबर केमिकल व पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल व राजेंद्र गांधी व्यवस्थापकीय संचालक जीआरपी लि. यांच्यासह देशातील विविध प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.