शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नवनगर विकास प्राधिकरण पन्नास वर्षानंतर विसर्जित होऊन पीएमआरडी विलीन करण्यात आले आहे. सात जून 2021 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या निर्णयाचे स्वागत करत पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांनी या प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री, तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात प्रशांत सपकाळ यांनी नमूद केले आहे की, प्राधिकरण जागी मधील अनधिकृत बांधकामे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हस्तांतर करण्यात यावी, थेरगाव वाल्हेकरवाडी रहाटणी या परिसरामध्ये प्राधिकरण जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी अहमदाबाद येथील एचसीपी डिजाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 कलम 3 च्या पोटकलम नुसार, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नगरविकास विभागाने 18 ऑक्टोबर 2021 रोजी जो आदेश दिला त्यानुसार आपण प्राधिकरण अतिक्रमित जी अनधिकृत बांधकामे आहेत ती सुद्धा गुंठेवारी विकास अधिनियमानुसार अधिकृत करून घ्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. असा निर्णय झाल्यास हजारो कुटुंबांना याचा लाभ होईल, असेही दिलेल्या पत्रकात प्रशांत सपकाळे यांनी अजित पवार यांना म्हटले आहे.