शबनम न्यूज | मुंबई (दि.११ डिसेंबर) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त येत्या १२ डिसेंबर रोजी पक्षातर्फे मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. फेसबुक, युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. पवार साहेब या रॅलीच्या माध्यमातून सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतील. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी कुणीही मुंबईत येऊ नये, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केले.
कोविडचे सर्व नियम पाळून व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली आहे. नेहरू सेंटर, वरळी येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरु होऊन तो १.३० वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसेच दरवर्षी आम्ही नवीन कार्यक्रम आखत असतो. यावर्षीही आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक नवे मोबाईल अॅप सादर करत आहोत. या अॅपद्वारे पक्ष संघटना आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होईल. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र युथ कार्निवल (मायोका) या कार्यक्रमाचीही घोषणा करण्यात येणार आहे.
साहेबांच्या वाढदिवसानंतर १४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२१ पर्यंत पक्षातर्फे स्वाभिमान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड असे विविध उपक्रम कोविडच्या मर्यादा पाळून जिल्हास्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राबवले जातील. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकांनी कोविड लस घेण्यासाठी पुढे यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जनजागृती करणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी कोषाध्यक्ष माजी आमदार मा. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस मा. शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनील गव्हाणे, महेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.