शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड परिसरात भोसरी हा सर्वाधिक मोठा औद्योगिक परिसर आहे. यामध्ये 76 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आहेत. साडेतीन हजार एकरमध्ये एमआयडीसी विस्तार वाढला आहे. यात सुमारे चार हजार प्लॉट धारक आहे. मागील अनेक दिवसांपासून या भागातील उद्योजक, काम करणारे नागरिक मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत. यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक निखिल काळकुटे शहराध्यक्ष, उद्योग आघाडी, भाजपा, पिंपरी-चिंचवड.यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भर दिवसा होणा-या चो-या,भंगार मालाची विक्री,रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे होणारे अपघात,अनधिकृत टप-या, कचरा, स्वच्छतागृहांचा अभाव, त्यामुळे महिलांची होणारी कुचंबणा, सीसीटीव्ही नसल्याने वाढती असुरक्षितता अशा एक ना अनेक समस्या एमआयडीसीमध्ये विशेषतः टी ब्लॉकमध्ये आहेत.
महिलांना रात्री-अपरात्री या भागातून जाताना बस अभावी नाहक समस्यांचा सामना करावा लागतो. स्वच्छतागृह नावाला देखील नाहीत. भोसरी एमआयडीसी चौकात कचरा कुंडीच नाही. त्यामुळे कच-याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फुलेनगर मधील उद्यानाचे आरक्षण असलेले ठिकाण तर मद्यपींचा अड्डा बनले आहे. चहा टप-यांच्या नावाखाली अनेक ठिकाणी दारू राजरोसपणे दारू विक्री केली जात आहे. एमआयडीसी परिसरातील काही नाले उघड्यावर आहेत. हे नाले कंपन्या आणि झोपडपट्टीमधून गेले आहेत. ड्रेनेज नसल्याने ब-याच ठिकाणी रासायनिक पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. गॅस पाईपलाईन देखील या भागातून गेली असल्याने स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एमआयडीसी परिसरात महापालिकेने मूलभूत सुविधा निर्माण करून देण्याबाबत अनेकदा महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केले आहेत. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेच्या दुर्लक्ष करण्यामुळे कंपन्यांमध्ये काम करणा-या कामगार आणि महिलांच्या आरोग्य, सुरक्षा आणि परिणामी भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्योजक आणि कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. शहरातील औद्योगिक क्षेत्रासाठी पायाभूत सोयी-सुविधांसह सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे. याकरिता ठोस उपाययोजना करा. कामगार आणि उद्योगांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्या, अशी मागणी नगरसेवक निखिल काळकुटे यांनी केली आहे.