शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ जानेवारी) :- चिखली, मोरे वस्ती परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तेथील पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर, भोसरी विधानसभा उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस ठाणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिखली मोरे वस्ती परिसरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये अल्पवयीन टोळक्यांचा उपद्रव चिंतेचा विषय बनला आहे. महिला मुलींची छेडछाड, त्यांचा पाठलाग करणे आदी प्रकार राजरोस घडत आहेत. रात्री अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड आणि मुद्देमाल हिसकावून घेणे त्यांना मारहाण करणे असे प्रकारही अधून मधून घडत आहेत.
मोरे वस्ती, साने चौक, बेंद्रे वस्ती, अष्टविनायक चौक ते वाघु साने चौक या रस्त्यावर छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी मद्यपानतेची टोळकी अंधाराचा फायदा घेत खुलेआम मद्यपान करत बसलेली असतात. त्याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोरेवस्ती परिसरात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे यासाठी या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी तसेच रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविणे गरजेचे झाले आहे.
नियंत्रण कक्षाकडून तक्रारदारांची नावे उघड करण्याचे प्रकार थांबवा :
अनेकदा एखादी घटना घडली अथवा गुन्हा घडल्यास जागरूक नागरिक सर्व प्रथम नियंत्रण कक्षाला १०० नंबर वर फोन करून माहिती देतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवणे गरजेचे आहे. मात्र पोलिसांकडून घटनास्थळी आल्यानंतर सर्रासपणे तक्रारदाराचे नाव उघड करतात. त्यामुळे पोलिसांना गुन्ह्याची माहिती देणे, हा अपघात करणे किंवा विनाकारण दुश्मनी करून घेणे अशी भावना संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीची होते. असे प्रकार रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असेही सदर निवेदनात नेताजी काशीद यांनी नमूद केले आहे.