शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० जानेवारी) :- बुधवार दि. १९/०१/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी मा. अध्यक्ष – श्री. संदीप बेलसरे व संचालक – श्री. नवनाथ वायाळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. राजेश पाटील साहेब यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या गुंठेवारी नियमास अनुसरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील औद्योगिक अनाधिकृत बांधकामे ही दि.३१ डिसेंबर २०२० पूर्वीची असल्यास गुंठेवारी नियमानुसार अधिकृत करून द्यावीत याकरिता निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात औद्योगिक स्थावर मालमत्ते विषयी येणाऱ्या विविध समस्या खालील प्रमाणे.
१. औद्योगिक अनाधिकृत बांधकामे नवीन गुंठेवारी नियमानुसार अधिकृत करणेबाबत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ३१.१२.२०२० पर्यतची फक्त रहिवाशी बांधकामे गुंठेवारी नियमानुसार अधिकृत करण्याकरिता नियमावली जारी केलेली आहे. त्यामध्ये औद्योगिक बांधकामाचा कोठेही उल्लेख केलेला नाही. परंतु महानगरपालिका कार्यक्षेत्रात रहिवाशी व औद्योगिक परिसरात लघुउद्योजकांनी आपले व्यवसाय सुरु केले होते. ही एक,दोन,पाच गुंठे व त्या पुढील क्षेत्रावरील केलेली सर्वच बांधकामे अधिकृत नसून यातील बरीचशी बांधकामे अनाधिकृत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने या औद्योगिक अनाधिकृत बांधकामाकरिता गुंठेवारी नियमावली जारी करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वच औद्योगिक बांधकामावरील शास्तिकर रद्द करून सदर बांधकामे ही गुंठेवारी नियमानुसार अधिकृत करावीत.
याकरिता आपण महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करावा व उद्योजकांना औद्योगिक अनाधिकृत बांधकामे गुंठेवारी नियमानुसार अधिकृत करण्यास सहकार्य करावे.
२. मूळ मिळकत कर भरण्याची मुदत वाढविणेबाबत :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मूळ मिळकत कर भरण्याची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०२२ पर्यत करावी.
३. विलंब शुल्क माफी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सध्या शास्ती कराची रक्कम वगळून मूळ मिळकत कराची रक्कम स्विकारण्यास तयारी दर्शविली असली तरी या मिळकत करात शास्ती विलंब दंड रक्कम लावून मिळकत कर बिले दिली जात आहेत. सध्या शास्ती विलंब शुल्क दंड ७५ टक्के माफ केले जाणार असे सांगितले असले तरी सदर विलंब शुल्काचा दंड हा १०० टक्के माफ करण्याची तरतूद ही संगणक प्रणालीमध्ये करून दंड माफ करावा.
४. शास्तीकर सरसकट माफी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात दोन,पाच,दहा गुंठे जागा घेऊन उद्योजकांनी,व्यापाऱ्यांनी व्यवसाय चालू केलेले असून या व्यवसायामुळे महानगरपालिकेला विविध करांच्या रूपाने उत्पन्न मिळत आहे. औद्योगिक आस्थापनांना, व्यापारी व रहिवास यांना महाराष्ट्र शासनाने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लावलेला शास्ती कर हा पूर्णतः सरसकट रद्द करून उद्योजकांना, व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
५. मिळकतकर अभय योजना :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ३०.०५.२०२० रोजी राबविलेली मिळकत कर अभय योजने अंतर्गत जो मिळकत कर भरण्यात आलेला आहे त्याची रक्कम ही मूळ मिळकत करातच जमा करावी.
या वरील सर्व समस्या करिता आपण महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करुन सहकार्य करावे, अशी विनंती पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी मा. अध्यक्ष – श्री. संदीप बेलसरे व संचालक – श्री. नवनाथ वायाळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.