शबनम न्यूज | पुणे
कोरोना काळात गृहकलह आणि घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नात्यात अविश्वास असल्याने अनेकजण विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी समोर आली आहेत. पण व्यावसायिक मिटींगच्या नावाखाली प्रेयसीला भेटायला जाणं एका बड्या उद्योजकाला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित उद्योजकाच्या पत्नीनं जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाचा पर्दाफाश केला आहे. पत्नीने सर्व पुरावे गोळा करत थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे.
आरिफ मांजरा असं गुन्हा दाखल झालेल्या बड्या उद्योजकाचं नाव आहे. आरोपी मांजरा हा व्यावसायिक मिंटींग्सच्या नावाखाली आपल्या प्रेयसीला भेटायला जात असे. पण आरीफच्या वागण्यातील बदल खटकू लागल्याने तिने आपल्या पतीचा भांडाफोड करायचं ठरवलं. यासाठी तिने तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आपल्या पतीच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवला.
आरिफ आपल्या पत्नीला खोटं बोलून नेहमी पुण्याला जात असल्याचं GPS ट्रॅकरवरून पत्नीच्या लक्षात आलं. त्यावरून आरीफच्या पत्नीने त्याची गाडी मुक्कामी थांबलेल्या हॉटेलचा पत्ता शोधून काढला. एवढेच नव्हे तर त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून आरिफसोबत कोण आहे? असं विचारलं.
तेव्हा आरिफसोबत त्यांची पत्नी असल्याची माहिती मॅनेजरनं दिली. हे ऐकून खऱ्या पत्नीला धक्काच बसला. त्यानंतर अधिक चौकशी केली असता, आरिफसोबत त्याची प्रेयसी मेघा सोंडी असल्याची माहिती पत्नीला मिळाली.ही माहिती मिळताच पत्नीने थेट पुणे गाठलं.
तसेच हॉटेलमध्ये जाऊन आपल्या नवऱ्याचं आणि त्याच्या प्रेयसीचे CCTV फुटेज मिळवले. सर्व पुरावे गोळा केल्यानंतर संबंधित महिलेनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपी आरिफ आणि त्याची पत्नी मूळचे गुजरात येथील रहिवासी आहेत.