राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आत्मचिंतन करावे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ मार्च) :- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक, राष्ट्रवादीत प्रवेश केलेले संबंधित लोक भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी नाहीत, असा दावा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केला आहे.
याबाबत संकेत चोंधे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कोणताही अधिकृत पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपा युवा मोर्चाचे काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये अमोल बेंद्रे, विजय शिंगारे, नितीन भिसे, सागर कांबळे, अविनाश विटकर, प्रकाश गवळी अशी नावे देण्यात आली आहेत. मात्र, यापैकी कोणीही भाजपा युवा मोर्चाच्या विद्यमान कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी नाहीत.
असे असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश असा खोटा प्रचार सुरू केला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरात संघटन सक्षम झाले असून, युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आगामी महापालिका निवडणुकीत युवा मोर्चा राष्ट्रवादीला तगडे आव्हान देण्यास सज्ज आहे. त्यामुळे धास्तावलेली राष्ट्रवादी आणि पदाधिकारी चुकीची माहिती पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही संकेत चोंधे यांनी केली आहे.