शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ एप्रिल) :- “फुलपाखराचे बागडणे म्हणजे ललितलेखन होय! रुक्ष मानवी जीवनात आनंद निर्माण व्हावा म्हणून ललितसाहित्याची निर्मिती झाली. ललितलेखन ही अवघड कला असून नंदकुमार मुरडे यांना ती साध्य झाली आहे!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी आनंदीबाई डोके सभागृह, केशवनगर, चिंचवड येथे सोमवार, दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी काढले. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे लिखित ‘दस्तऐवज शब्दांचा’ या ललितलेखनसंग्रहाचे आणि ‘शब्दानंद’ या कवितासंग्रहाचे अनुक्रमे प्रा. तुकाराम पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, कवयित्री शोभा जोशी, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून, “कविता म्हणजे सोन्याच्या खाणीतील मूठभर माती होय! त्या मातीवर शब्दसंस्कार करण्याचे काम कवी करीत असतो!” असे मत व्यक्त केले.
सुरेश कंक यांनी, “मुरडे यांच्या रूपाने आळंदीचा मोगरा चिंचवड येथे फुलला असून ‘दस्तऐवज शब्दांचा’ या ललितलेखांना कस्तुरीचा सुगंध आहे!” असे विचार मांडले. नंदकुमार मुरडे यांनी आपल्या कृतज्ञतापर मनोगतातून, “अंगभूत कलागुणांना मुक्त करण्यासाठी साहित्यसाधना सुरू केली अन् साहित्यिक मित्रांचा अनमोल खजिना मला गवसला. आजवरच्या जीवनप्रवासात पत्नी अन् कुटुंबीयांची साथ लाभली. त्या बळावर या क्षेत्रांत अत्युच्चपदी पोहोचण्याची आकांक्षा आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, अमृता पेटकर, रमेश इनामदार, रघुनाथ पाटील, राजाराम कोंढाळकर यांच्या मनोगतांतून नंदकुमार मुरडे यांच्या व्यक्तिगत अन् साहित्यिक प्रवासातील विविध पैलू उलगडत गेले. मान्यवरांच्या हस्ते दोन लाकडी पेट्या उघडून अभिनव पद्धतीने पुस्तकांचे प्रकाशन झाल्यानंतर समरसता साहित्य परिषद, गझलपुष्प, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, खुशबू परिवार, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघ, मोरया सीनिअर सिटिझन कट्टा, पिंपरी-चिंचवड साहित्य संवर्धन समिती या संस्थांकडून रजनी आणि नंदकुमार मुरडे या दांपत्याचा हृद्य सत्कार करण्यात आला. सुखदा अमित मुरडे, मेधा कौस्तुभ पिंगळे, लक्ष्मी विकास कुलकर्णी, नीता नितीन हिरवे यांनी संयोजन केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सुखदा मुरडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.