…अन्यथा अनधिकृत होर्डींगचे तीन वर्षाचे परवाना शुल्क हे दंड स्वरुपात वसूल होणार
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- महापालिकेने खाजगी जागेतील अनधिकृत होर्डींग निष्काशीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. गेल्या आठवडयात संपूर्णत: अनाधिकृत असलेले संपूर्ण शहरातून २८ होर्डींग काढून टाकण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडे अनधिकृत होर्डींग नियमित करण्यासाठी आलेल्या अर्जांची स्थळ पाहणी व छानणी करून संदर्भीय सर्व अर्ज फेटाळण्यात आले असून त्यांना होर्डींग काढण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. तीन दिवसांच्या मुदतीने जर त्यांनी होर्डींग काढले नाहीत. तर अशा अनधिकृत जागेवरील होर्डींग महापालिकेकडून काढण्यात येतील. ते होर्डींग काढण्याचा खर्च संबंधित जागा मालकाकडून वसूल करण्यात येईल, तरी संबंधित होर्डींगधारक व जागा मालकांनी महापालिकेच्या सूचनेची दखल घेवून होर्डींग काढून टाकावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त् तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन बाहय जाहिरात धोरण विचाराधीन आहे. या धोरणाचा शहराच्या सौदर्यात समग्र विचार करण्यात आलेला आहे. सदर धोरणाला अनुसरुन मनपा जागेतील १३५ अनधिकृत होर्डींग यापूर्वीच काढण्यात आलेले आहेत. तसेच, होर्डींग नियमीत करण्यासाठी आलेले अर्ज व प्रत्यक्ष स्थळपाहणी केल्यानंतर अर्जात नमूद आकारमान आणि प्रत्यक्ष उभे केलेले आकारमानात विसंगती दिसून आलेली आहे. यामध्ये, पुर्वीचे नवीन परवानगीसाठी ११७ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, प्रकटन नियमीत परवानगीसाठी २६८ अर्ज प्राप्त झाले होते. फलक उभा करून बराच कालावधी झालेला आहे. सदर फलकापासून जागा मालक उत्पन्न मिळवत आहेत. त्यातून मनपास कोणतेही शुल्क भरले जात नसल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, होर्डींगधारक / जागा मालकांकडून संदर्भीय तरतुदींचा भंग झाला आहे. त्याचबरोबर गतवर्षी सन २०२१- २२ मध्ये परवानगीसाठी अर्ज प्राप्त झालेले होते, त्यापैकी काही ठिकाणी विनापरवाना होर्डींग उभा केल्याचे दिसून आलेले आहेत. असे होर्डींग देखील महापालिकेकडून काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या अनधिकृत होर्डींगचे तीन वर्षाचे परवाना शुल्क हे दंड स्वरुपात वसूल करण्यात येणार आहेत.
जागा मालकांनी आपल्या मालकीचा जाहिरात फलक मनपाचे पत्र मिळालेल्या दिनांकापासून ३ दिवसाचे आत स्वत:हून काढून टाकावा. अन्यथा आपला जाहिरात फलक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ या अधिनियमाच्या नियम ८ (ख) नुसार महापालिकेमार्फत आपल्या जोखमीवर काढण्यात येईल. सदर फलक काढण्याचा खर्च हा होर्डींगधारक व जागा मालक यांच्याकडून मनपा अधिनियम ४३९ मधील तरतुदीनुसार वसूल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ही वसूली महापालिकेच्या नियम ४३९ नुसार मालमत्ताप्रमाणे वसूल करण्यात येईल. तरी अशा अनधिकृत होर्डींगधारकांनी आपले होर्डींग काढून घ्यावेत, असेही आयुक्त् तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नमूद केले आहे.