१५५ नृत्य कलाकारांचा सहभाग, जागतिक नृत्य दिवस निमित्त कलारसिकांना पर्वणी !!
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती व शहरातील २० नामांकित नृत्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिनांक २९/०४/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ”नृत्य तरंग” या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये विविध नृत्य रचनांचे नृत्यसादरीकरण सोबत कथक,भरतनाट्यम्,ओडिसी, मोहिनीअट्टम् या ४ नृत्य शैलीतून एकाचवेळी ७५ कलासाधकांचे “वंदे मातरम” नृत्य सादरीकरण होणार आहे, या नृत्य तरंग कार्यक्रमात एकूण १५५ नृत्य कलाकारांचा सहभाग असणार आहे.
यावेळी संस्कार भारती पश्चिम प्रांत चे महामंत्री सतीशजी कुलकर्णी, विख्यात भरतनाट्यम गुरू स्वाती दातार, डॉ.मीनल कुलकर्णी यांच्यासोबत गुरु सुवर्णा बाग, संस्कार भारती पश्चिम प्रांत प्राचीन कला आणि ऐतिहासिक वास्तू विधेच्या संयोजिका विनिता देशपांडे, साहित्य विधेच्या संयोजिका विशाखा कुलकर्णी, प्रख्यात बासरी वादक श्री. हिमांशू नंदा, समिती अध्यक्ष श्री. सचिन काळभोर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
तरी या भव्य नृत्य सोहळ्यास कलासाधकांना प्रोत्साहन देण्यासाठी कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या सचिव लीना आढाव यांनी केले आहे.