दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी : कृष्ण प्रकाश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर दोनशे कोटी रुपयांचे आरोप करणारे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे या आरोप करणाऱ्या पत्रा बाबत स्वतः कृष्ण प्रकाश यांनी खुलासा करून सदरचे पत्र केवळ माझी बदनामी करण्यासाठी व्हायरल होत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी याबाबत खुलासा देतांना म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे.
सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखिल वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत.
पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम , आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारचे विघ्नसंतोषी लोकांचे आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे, तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की “ मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाई मुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही. “
कृष्ण प्रकाश ( भा. पो. से )
ज्या पोलिस निरीक्षक डॉक्टर अशोक डोंगरे यांच्या नावाने पत्र वायरल झाले होते त्यांनी सदरचे पत्र हे पोलीस खात्याला बदनाम करण्यासाठी तसेच माझ्या नावाचा गैरवापर करून पत्र तयार करण्यात आल्याची तक्रार पोलिस आयुक्तालयात दाखल केली आहे.