सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांची बाजी
शबनम न्युज | मुंबई
राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. राज्यसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स अखेर संपला. मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला. त्यात या निवडणुकीत भाजपचे तीन, तर शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
या निवडणुकीत पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची ४१ मते मिळाली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते, पीयूष गोयल यांना ४८ मते, अनिल बोंडे यांना ४८ मते आणि इम्रान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली आहे. तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते तर भाजपचे धनंजय महाडिक यांना २६ मते मिळाली आहेत.
भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी देण्यात आलेल्या उमेदवारापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.
कुणाचे किती उमेदवार विजयी?
भाजप – 3
शिवसेना – 1
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी काँग्रेस – 1
पहिल्या पसंतीची कुणाला किती मते?
प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
संजय राऊत, शिवसेना – 41
पियुष गोयल, भाजप – 48
अनिल बोंडे, भाजप – 48
सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?
धनंजय महाडिक, भाजप – 41
संजय पवार, शिवसेना – 33