शबनम न्युज | मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना वर्षावर बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ विधानसभेचे आमदार उपस्थित राहिल्याचं दिसून आले. गुजरातमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार आहेत. त्यासाठी हॉटेलबाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर भाजपामध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व घडामोडी पाहता शिंदे यांनी ट्विट करून सांगितले कि, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असे ट्विट शिंदे यांनी केले आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
तर दुसरीकडे वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत. आपल्याला एकत्र राहायचं आहे असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे. तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. तर त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली.