शबनम न्यूज | मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर शिवसेना आमदार- खासदारांच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.
‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..’ असे ट्विट खा. संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.