शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार होती. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं.
तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं मिळाली आहेत. १०० मतं पूर्ण झाल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. तीन आमदार तटस्थ राहिले असून यामध्ये समाजवादी पक्ष आणि एमआयएमचा समावेश आहे.
व्हिपमध्ये ठाकरे गटातील १६ आमदारांसह सर्व आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे सध्या विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये ‘व्हिप-वॉर’ सुरू झाली होती. भाजपकडून राहुल नार्वेकर, तर शिवसेनेकडून राजन साळवी रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी मतदानाची मागणी करण्यात आली होती.