शबनम न्युज | पिंपरी
जर्मन मॉडेलवर आधारित तंत्रकुशल प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (टीओटी) भारतातील ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रशिक्षकांद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या मनुष्यबळाचा उपयोग भारत आणि जर्मन उद्योग क्षेत्राला उपलब्ध होईल. त्यामुळे भारताच्या जीडीपीमध्ये व विशेषत: ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये वाढ होईल असा विश्वास इंडो-जर्मन व्होकेशनल एज्युकेशन ट्रिटीचे (आयजीव्हीइटी) प्रकल्प संचालक डॉ. रॉडनी रिव्हीअर रोजी यांनी व्यक्त केला.
भारत भरातील लघुउद्योजकांसाठी केंद्र सरकारने चिंचवड पुणे येथे भारतातील एकमेव इंजिनिअरिंग क्लस्टर उभारले आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय, इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे, जर्मन इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जीआयझेड), जेसेलशाफ्ट फॉर इंटरनॅशनल झुसंमेनार्बेट (जीआयझेड) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे येथे आयोजित केलेल्या (टीओटी) प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. रॉडनी रिव्हीअर बोलत होते.
यावेळी इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे, राज्य शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर प्रकाश रोंदाळकर, एएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी, जर्मन ड्यूल प्रो अँड प्रो रिकॉग्निशनच्या प्रमुख इयसाबेल थेनिन्जर, आयजीव्हीइटीचे प्रकल्प संचालक डॉ. रोडनी रिव्हीअर, जर्मन इंटरनॅशनल को-ऑपरेशनचे (जीआयझेड) व्होकेशनल अॅन्ड लेबर मार्केटिंग सल्लागार अमर प्रतापराव पाटील, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे वरिष्ठ सदस्य इरफान आवटे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. रॉडनी रिव्हीअर म्हणाले कि, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या उपक्रमात भारतातील औद्योगिक आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या प्रशिक्षकांना उच्चतम दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमात सरावावरही भर देण्यात येत असल्याने हे प्रशिक्षण प्रशिक्षकांना अद्ययावत होण्यासाठी उपयुक्त आहे. कामगारांना उच्चतम दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात खूप मोठी क्षमता आहे. त्यामुळे प्रशिक्षकांची आणि कामगारांचीही गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असेही डॉ. रिव्हीअर यावेळी म्हणाले
इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे म्हणाले कि, भारत सरकार आणि जर्मन सरकार यांच्यात झालेल्या सहकार्य करारानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कौशल्य विकास मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिलची (एएसडीसी) नेमणूक केली असून जेसेलशाफ्ट फॉर इंटरनॅशनल झुसंमेनार्बेट (जीआयझेड) च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सीएनसी प्रोग्रामिंग, अँड ऑपरेशन, ऍडव्हान्स वेल्डिंग टेक्नॉलॉजी, रोबोटिक टेक्नॉलॉजी अँड ऑपरेशन, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, ऍडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, सीएनसी मशील संबंधित प्रशिक्षणामध्ये सरकारी अथवा खासगी आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, खासगी संस्थेत काम करत असलेले प्रशिक्षक यांना त्यांचे प्रशिक्षण तंत्र उच्चतम करण्यासाठी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कुशल तंत्रज्ञ, तांत्रिक सल्लागार यांना सीएनसी मशीन प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (टीओटी) या जर्मन ड्युएल वेट मॉडेलवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी भारत भरातील आयटीआय, डिप्लोमा. इंजिनिअरिंग आधिक दोन वर्षाचा अनुभव असणा-यांना उपलब्ध होणार आहे. सहभागी होणा-या सर्व प्रशिक्षकांना १० हजार रुपये शिष्यवृती मिळणार असून पुण्या बाहेरील प्रशिक्षार्थांनी निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी एएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी म्हणाले की, औद्योगिक आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कामगारांना उच्चतम दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात केवळ भारतातच नाही, तर जगभरात रोजगाराच्या संधी आहेत. उद्योगांची गरज आणि उच्चतम तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता असलेले मनुष्यबळ यात मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण हा उपक्रम काळाची गरज आहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर प्रकाश रोंदाळकर म्हणाले की, पुणे जिल्हा हा सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेला जिल्हा आहे. पुण्यातून सर्वाधिक ऑटोमोबाईलचे सुटया भागांची जगभरातील कंपन्यांना निर्यात होते. बदलत्या परिस्थितीत उद्योगांची गरज काय आणि आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकविला जाणार अभ्यासक्रम यात फरक आहे. कामगारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकांमुळे ही दरी भरून निघण्यास मदत होईल त्याच बरोबर उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होईल.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले की, उद्योजकांची गरजा काय आहेत, याचा विचार करून पिंपरी चिंचवड महापालिका उपक्रम राबविते. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यांसारखा उपक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविता येईल का, याचा विचार महापालिका करेल.
यावेळी उपस्थित मान्यवरांना झाडांची रोपे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, प्रतिकात्मक वॄक्षारोपणांतर्गत कुंडीत झाडांच्या बिया लावण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एएसडीसीचे गणेश दिवेकर यांनी केले. एसजीइसीपीएलचे किरण नवाथे यांनी उपस्थितांचे आभार मानले.