फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री – अजित पवार
शबनम न्युज | पिंपरी
गेल्या एक महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रीमंडळ आहे. मुख्यमंत्री एकटे आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आहेत. असे असले तरी त्यांना खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर साधला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे ‘निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा’ ही संवाद सभा चिंचवड येथे झाली.
राज्याचे प्रशासन ठप्प पडले असून शिंदे, फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले आहेत, असे सांगत आता तरी मंत्रीमंडळ विस्तार आणि जिल्ह्यांना पालकमंत्री देण्याची सुबुध्दी पांडुरंग त्यांना देवो, अशी प्रार्थना केल्याचे पवारांनी यावेळी नमूद केले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, मंगला कदम, अपर्णा डोके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.