परिस्थितीशी झुंज देश यश मिळवलेल्या नमिता कोहोक यांचे कार्य प्रेरणादायी
शबनम न्युज | पुणे
“पहिल्या केमोथेरपीवेळी माझी पहिली कंपनी सुरु केली. मला जोखीम घ्यायला आवडते. जोखमीशिवाय यश मिळत नाही, यावर माझा विश्वास आहे. जेव्हा परिस्थिती परीक्षा घेते तेंव्हाच जिद्द निर्माण होते, याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. अचानकपणे सौंदर्य स्पर्धांमध्ये उतरले आणि क्राऊन मिळाले. कर्करोग पीडित महिलेत काय ताकद असणार, असे म्हटले गेले तेंव्हा पॉवर लिफ्टिंगला सुरुवात केली आणि दोनवेळा सुवर्णपदक पटकावले,” असे प्रतिपादन कर्करोगपीडित पहिल्या ‘मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफटाईम क्वीन २०१८’ डॉ. नमिता कोहोक यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नवीन वर्ष सुरु होत असताना कोविड काळातील ऑनलाईन सवयींना छेद देत प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेण्याची सवय लागावी व त्यासाठीची एकाग्रता वाढावी म्हणून आयोजित ओरिएन्टेशन कार्यक्रमात डॉ. कोहोक बोलत होत्या. डॉ. कोहोक यांनी आपली प्रेरणात्मक, संघर्षपूर्ण जीवन कहाणी विद्यार्थ्यांना सांगत अनेक कानमंत्र दिले. यावेळी त्यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ‘मिसेस सूर्यदत्त २०२२’ व ‘सूर्यभूषण २०२२’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील उपस्थित होते.