शबनम न्युज | पुणे
जागतिक फार्मासिस्ट दिन’ निमित्त, भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधार, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च व पुण्यातील फार्मसी महाविद्यालयांच्या सहकार्याने फार्मासिस्ट विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या वर्षीचे उद्दिष्ट जगभरातील आरोग्यावर फार्मसीचे सकारात्मक परिणाम दाखवून देणे आणि व्यवसायातील एकता आणखी मजबूत करणे हे आहे.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी भारतातील सर्वात तरुण उद्योजक २० वर्षीय जेनेरिक आधारचे संस्थापक आणि सीईओ अर्जुन देशपांडे, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्रचे सहआयुक्त एस. बी. पाटील, एमसीई सोसायटी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. हणमंतराव कदम, उपप्राचार्य प्रा. पोपट आबासाहेब जाधव, व्याख्याता प्रा. प्रवीण पवळे, जेएसपीएम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे पाचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर आदी उपस्थित होते.
फार्मा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अर्जुन देशपांडे यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२२’ प्रदान करण्यात आला. ३० महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूर्यदत्ततर्फे सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स, तसेच ३० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. या कार्यक्रमात पाच हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. तसेच, संपूर्ण भारतातील विविध विद्यापीठांमधून २५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. अर्जुन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करत फार्मा क्षेत्रातील नवीन पैलू उघडले. आज जेनेरिक आधारची १५० पेक्षा अधिक शहरांमध्ये सेवा सुरु आहे.
“फार्मासिस्ट हे दुसरे डॉक्टर आहेत. ते कोरोना काळात आघाडीवर असलेले कोरोना योद्धे होते. ते देशाच्या पाठीशी उभे राहिले. आज या राष्ट्रीय फार्मासिस्टच्या २०२२ च्या परिषदने फार्मास्युटिकल उद्योगात इतिहास घडवला आहे. अनेक वर्षे या क्षेत्रात फार्मासिस्टची पोचपावती मर्यादित होती. पण आज ३०,००० पेक्षा अधिक फार्मसी विद्यार्थी आणि १०० पेक्षा अधिक विद्यापीठांसोबत हेल्थकेअर जगाच्या सुधारणेसाठी फार्मा क्षेत्राला एक नवी दिशा देण्यासाठी आम्ही हे मिशन सुरू केले आहे,” असे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “फार्मा इंडस्ट्रीसाठी पुणे अनुकूल ठिकाण आहे. फार्मा आणि हेल्थकेअर ही आजच्या काळाची गरज आहे. या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. अवघ्या सोळाव्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनेरीक आधार सुरु केले आणि विसाव्या वर्षी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्तच्या वतीने त्यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद वाटतो. आयुष्याच्या प्रवासात अडचणी, चढ-उतार येतात. त्याला न डगमगता सामोरे जावे लागते. जिद्दीने प्रयत्न केले, तर यश नक्की मिळते.” सूत्रसंचालन ‘सूर्यदत्त’चे संचालक प्रा. प्रशांत पितालिया आणि प्राची गडकरी यांनी केले.