शबनम न्युज | पुणे
एकांकिका स्पर्धा म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, उत्साह आणि नव्या दमाच्या लेखकांची संहिता रंगमंचावर यथार्थपणे साकारण्याची सर्व विभागातून होणारी कमालीची चुरस. यातून प्रेक्षकाला एका अनोख्या प्रयोगाचा आस्वाद घेता येतो. अलिकडेच क्यू मराठी वाहिनीने ‘क्यू मराठी युथफुल महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या विभागात घेण्यात आली. या प्रत्येक विभागातुन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा प्रतिसाद पाहता काही विभागावर स्पर्धा दोन दिवस करावी लागली. याच प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरी साठी एकूण २५ एकांकिका निवडल्या गेल्या. याच निवडलेल्या दर्जेदार अशा २५ एकांकिका मुंबईत रंगशारदा सभागृह, वांद्रे, पश्चिम येथे ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात सादर होत आहेत. सदर एकांकिकांना परीक्षक म्हणून दिग्गज नाट्य-सिने अभिनेते डॉ.गिरीश ओक, नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री अदिती सारंगधर लाभले आहेत.
रंगमंचावर नाटक पाहणे हा एक वेगळा आणि अद्भुत अनुभव असतो. मोठ्या शहरात प्रेक्षकांना असे नाट्य-प्रयोग पाहण्याची संधी मिळते परंतु महाराष्ट्रातील सगळयाच प्रेक्षकांना ही प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची संधी मिळत नाही. अशा प्रेक्षकांसाठी क्यू मराठी वाहिनीच्या वाहिनीप्रमुख नीता ठाकरे आणि प्रोग्रामिंग प्रमुख निनाद सोनावणे यांनी आता हा नाटकांचा खजिना महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना मोफत पाहता यावा यासाठी याचे प्रक्षेपण क्यू मराठी वाहिनीवर करण्याचे ठरवले त्यामुळेच आता महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकांना घरबसल्या दर्जेदार नाटकांचे प्रयोग ७ ऑक्टोबर पासून रोज सायं ७.३० वाजता पहायला मिळणार आहे.