शबनम न्युज | रावेत
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तसेच लोखंडी हत्याराने मारून जखमी केल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२२ रोजी किवळे पुणे येथे घडली.
याबाबत पृथ्वीराज दत्तात्रय पाटील (वय २३, रा. कुटे वृंदावन, विठ्ठल मंदिराच्या मागे, विठ्ठलवाडी, आकुर्डी पुणे) यांनी फिर्याद दिली असून, याप्रकरणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मिया युसुफ खान (रा. देहू रोड) हसन शेख (रा. देहूरोड), स्वस्तिक गणेश शेट्टी (रा. ता.मावळ, जि. पुणे) तसेच यांच्या सह त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी आणि आरोपींचे जुने भांडण होते. काही दिवसांपूर्वी फिर्यादी व फिर्यादी यांचे मित्र असे दोघे मिळून फुटबॉल खेळत असताना, फिर्यादी यांच्या कडून खेळत असलेल्या ठिकाणी उभे असलेल्या बुलेट मोटरसायकलला चुकून बॉल लागला असताना त्यावेळी हसन आणि स्वस्तिक हे तेथे आले व तू माझ्या गाडीला बॉल का मारला? असे बोलून वाद निर्माण केले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी १३ ऑक्टोबर रोजी फिर्यादीस खंडणी मागून मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्र-मैत्रिणीबरोबर कास्क अँडक्रेडत कॉफी शॉप मध्ये गप्पा मारत असताना, आरोपी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मिया खान याने फिर्यादीस भांडणे मिटवायचे असतील तर मला एक पेटी दे असे बोलून खंडणी मागून हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तसेच हसन शेख याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून फिर्यादीस जखमी करून स्वस्तिक शेट्टी व त्याचे इतर दोन साथीदार यांनी देखील मिळून फिर्यादीस हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे करीत आहेत.