शबनम न्यूज / बीड
शिरूर: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी विशाल कुलथे नावाच्या एका सराफ व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाला आपल्या सलूनमध्ये बोलावून त्याच्या मानेत कात्री खूपसून हत्या केली होती. पूर्व नियोजित पद्धतीने हत्या केल्यानंतर आरोपींनी सराफा व्यावसायिक विशाल कुलथे यांचा मृतदेह आपल्याच शेतात नेऊन पुरला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे आणखी एका हत्येचं गूढ उलगडलं आहे.
सराफा व्यावसायिक विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या गायकवाड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे नाशिकमधून अटक केली आहे.
दरम्यान पोलीस चौकशी सुरू असताना, आरोपी भैय्या गायकवाड याने दोन महिन्यांपूर्वी मित्रांच्या मदतीने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या एका प्रश्नामुळे आरोपी भैय्या गायकवाडचा भांडाफोड झाला आहे. पोलीस चौकशीत ‘ही कितवी बायको आहे? असा प्रश्न विचारला असता गोंधळून गेलेल्या आरोपीने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या दुसऱ्या एका हत्येची माहिती दिली आहे.
मुळचा शेगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील रहिवासी असणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड बीड जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी आपल्या मामाकडे वास्तव्याला होता. तो आपल्या गावात मुलींची छेड काढत असल्याने त्याला एकदा चोप मिळाला होता. त्यामुळे घरच्यांनी त्याची रवानगी मामाकडे शिरूर याठिकाणी केली होती. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी ज्ञानेश्वरची ओळख शीतल भामरे नावाच्या एका विवाहित महिलेशी झाली. तिला दोन मुलं असूनही आरोपीच्या प्रेमाखातर ती आरोपीसोबत राहायला शिरूर याठिकाणी आली. याठिकाणी दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होते.
पण काही दिवसांतच आरोपी ज्ञानेश्वर चारित्र्याच्या संशयातून विवाहित प्रेयसीला त्रास देऊ लागला. यातून दोघांत खटके उडू लागले. त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने मला परत नाशिकला नेऊन सोड असं सांगितलं. यावेळी आरोपीने 15 मार्च रोजी राहुरी याठिकाणी मित्र केतन लोमटे याच्यासोबत मिळून प्रेयसी शीतलचा डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. प्रेयसीचा खून केल्यानंतर त्याने आणखी एका मुलीशी विवाह केला होता. पण विवाहनंतर महिन्याभरातच त्याने सराफाचा खून केला. या घटनेचा तपास सुरू आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे