शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात दीपावलीचे औचित्य साधून स्वच्छता का उपहार या कार्यक्रमाअंतर्गत खेळ पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त महिला आणि महिला बचत गटांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अथवा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार घनकच-याच्या स्त्रोतावर विलगीकरण या मोहिमेअंतर्गत स्वच्छता का उपहार ही मोहीम राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करून अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे.
आज ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत डायनासॉर उद्यान, पिंपळे गुरव या ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक भीमराव कांबळे यांच्यासह मोठ्यासंख्येने महिला आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. अनेक तास रंगलेल्या या खेळात सह शिक्षिका अनुजा कांबळे या विजेत्या ठरल्या असून मानाच्या पैठणीच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.
दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आकुर्डी येथील पंचतारा नगर मध्ये आकुर्डी हॉस्पिटल जवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी ३ वाजता ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यान येथे सायंकाळी ५ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न होईल.
दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात चिंचवड येथील राजमाता जिजाऊ उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत भोसरी येथील इंद्रायणीनगर मध्ये इंद्रायणीनगर बॅडमिंटन हॉल या ठिकाणी दुपारी १२ वाजता हा खेळ रंगणार आहे. तर ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोशी येथील नागेश्वर मंदिरासमोर दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात दापोडी येथील दापोडी विहार या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता हा खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता, कचरा विलगीकरण, प्लास्टिक बंदी आणि प्रदूषण आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे.