भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
शबनम न्युज | पुणे
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला. शनीवार, २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम झाला. मेहदी हसन, अनुप जलोटा, जगजित सिंग यांनी गायलेल्या रचनांचा ‘ सुबह- ए-समर्पण ‘ हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
व्ही.पी.म्युझिक अॅकेडमी निर्मित या कार्यक्रमात विवेक पांडे, प्रिशिता पांडे यांनी भजन, गरबा गीते, गझलांचे बहारदार सादरीकरण केले. प्रकाश सुतार ( कीबोर्ड ), सारंग भांडवलकर ( तबला ), आसिफ खान उस्मान इनामदार ( संगीतवाद्य ) , अतुल गद्रे (गिटार ) यांनी साथसंगत केली.
‘ मैलि चादर ओढ के कैसे ‘ या भजनगुरू हरी ओम शरण यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. अनुप जलोटा यांच्या ‘ऐसी लागी लगन ‘,च्या समर्पित भजनांनी दिवाळीची पहाट भक्ती रंगांने उजळत गेली. अनुप जलोटा यांनी लोकप्रिय केलेली ‘ रंग दे चुनरिया ‘,’चदरिया झिनी, रे झिनी ‘ अशी भजने रसिक प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.
‘ ये दौलत भी ले लो ‘ , ‘फिर छिडी बात, रात फुलों की ‘ , ‘ चुपके , चुपके रातदिन ‘ , ‘दिल ढुंढता है ‘, ‘ आज जाने की जिद ना करो ‘ सारख्या काही रसिकप्रिय गझलाही सादर करण्यात आल्या.मेहदी हसन यांची ‘रंजीश ही सही ‘ गझल वाहवा मिळवून गेली.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४४ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.अपर्णा दास यांनी आभार मानले.