शबनम न्युज | मांढरगड
क्षेत्र मांढरदेवी येथे सोमवारी (दि.०७) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या गाभाऱ्यातील पणत्या व संपूर्ण मंदिर परिसरातील विविध प्रकारचे दिवे व आकर्षक रांगोळीची केलेली आरास तसेच शेकडो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय हार, तोरण, फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला होता.
दिव्याच्या प्रकाशात मांढरदेवीच्या आई काळेश्वरीची मोठी रांगोळी विलोभनीय दिसत होती. भाविकांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.
दिपप्रज्वलन व आकर्षक रांगोळ्या काढण्याची संकल्पना गुरुवर्य अक्षयभाऊ सूक्रे यांची असून ते व त्यांचे शिष्य तेथे उपस्थित होते. या वेळी मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट व आईचे पुजारी दिलीप क्षीरसागर आणि संजय क्षीसागर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच नागरिक, महिला भगिनी, सेवेकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपोत्सवात पणत्या लावण्यासाठी उपस्थित भक्तांनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला.
गाभाऱ्यातील व परिसरातील सर्व लाईट बंद करून तेलाचे दिवे, समई व पणत्यांच्या मंद प्रकाशात आई काळेश्वरीची मुर्ती डोळ्यांचे पारणे फेडत होती. यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले.