शबनम न्युज | कात्रज
येथे हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेल मालकाने दोन ग्राहकांवर चाकूने वार केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निशांत जाधव (वय २५, रा. धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४४), ऋषिकेश जयसिंह देशमुख (वय ३०, दोघेही रा. मांगडेवाडी, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव आणि त्यांचा मित्र मांगडेवाडी भागातील मल्हार फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव आणि त्यांचा मित्र मोठ्याने गप्पा मारत होते. त्यावेळी हॉटेल मालक मनोहर मांगडे आणि देशमुख यांनी जाधव यांना मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. मांगडे आणि देशमुख यांनी जाधव आणि त्यांच्या मित्रावर चाकूने वार केले. हॉटेलमधील वेटरने दोघांना बांबूने मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मांगडे आणि देशमुख यांना अटक करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.