शबनम न्युज | मुंबई
“महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्यांचा वापर शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या निर्भया पथकाची पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
यावरून राज्यातील अनेक नेत्यांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका केली. त्या म्हणाल्या, “डॉ. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळी ‘निर्भया फंड’ची स्थापना करण्यात आली होती. राज्य आणि देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी हा निधी निर्माण केला होता. या निधीचे पैसे फक्त महिला सुरक्षेसाठीच वापरायला हवे. पण महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्या वेगळ्या कारणासाठी वापरल्या जात आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे.”
“लोकप्रतिनिधिंची सुरक्षा महत्त्वाची आहे, ही बाब मी मान्य करते. पण त्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्या काढून घेणं, हे अयोग्य आहे. राज्यातील महिला आणि नागरिकांची सुरक्षा, हा कुठल्याही सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. या सरकारमध्ये ‘व्हीआयपी कल्चर’ फोफावत असून हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.