शबनम न्युज | पुणे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज पुणे शहरात बंद पाळण्यात आला आहे. या बंदला पुणे शहरातील नागरिकांचा व व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या बंद बरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. डेक्कन जिम खाण्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली.
सदर मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळी याबरोबरच मुस्लिम संघटनांनी या पुणे बंदला पाठिंबा दिला असून, ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता झाली.
‘छत्रपती शिवाजी महाराज की सम्मान में मुसलमान मैदान में’ अशी घोषणाबाजी करत मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही, शिवरायांच्या सन्मानार्थ या मोर्चा सहभागी झाल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही जात-पात, धर्म या कोणत्याही गोष्ट विचार न करता, फक्त शिवाजी महाराजांचे सन्मानार्थ या मोर्चात सहभागी झालो आहोत, शिवप्रेमी सर्वधर्मीय पुणेकर म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.