शबनम न्युज | पुणे
अवैधरीत्या जाहिरातबाजी करणाऱ्यांची संख्या शहरात मोठी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) शहरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या अनेक बसथांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजी केल्याचे दिसून येते. त्यामुळे बसथांब्यावर आलेल्या प्रवाशाला वेळापत्रक व बसमार्गाची माहिती मिळत नाही. तसेच बसथांब्याचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे जाहिरातबाजांवर कारवाई करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून पीएमपीचे ९ हजार थांबे आहेत. त्यापैकी अडीच ते तीन हजार थांब्यांवर पीएमपीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी शेड उभारले आहे. याठिकाणी मार्गांची माहिती, वेळापत्रक लावले आहे. अनेकदा वाढदिवस, स्वागताच्या जाहिराती लावल्या जातात.
काही ठिकाणी राजकीय व्यक्तींच्या जाहिराती बेकायदेशीर पद्धतीने लावल्या जातात. खासगी कंपन्या, स्थानिक पत्रकेदेखील लावली जात असल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. याच अनधिकृत जाहिरातबाजांवर पीएमपी प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच या कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.