शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील चाकण परिसरातील एका खाजगी कंपनीत मागील काही दिवसांपूर्वी एक भीषण अपघात घडला. या कंपनीत कार्यरत असणाऱ्या पंचवीस वर्षीय सरिता या महिलेचे केस अचानक वाइंडिंग सारख्या एका मशीनमध्ये खेचली गेली. या अपघातात तिच्या पापणीच्या वरून तिच्या मानेच्या मागच्या बाजूला कवटीच्या आवरणाला दुखापत झाली. हा अपघात इतका भयानक होता की या महिलेचे एका कानापासून तर दुसऱ्या कानापर्यंत केस ओढले गेल्याने एका बाजूचा कान ही तुटला व त्वचा सोलली गेली. तिला या अतिवेदनादायक परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य बिर्ला या नामांकित रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार करताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्व परिस्थितीवर मात करीत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेचे जीव वाचविण्यात यश संपादन केले आहे. याबाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत संबंधित वैद्यकीय अधिकारी, सल्लागार प्लास्टिक सर्जन, डॉ.विक्रम वाघ यांनी या महिलेवर केलेल्या उपचाराची माहिती दिली.
ते म्हणाले, “आम्ही तिचे प्राथमिक उपचार केले आणि तिला सक्रिय केले. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. आम्ही रक्तस्त्राव थांबवला, तिच्या कवटीला चिकटलेले ग्रीस, तेल, कण इत्यादी काढून टाकले आणि त्यावर पट्टी बांधली. पण ती हेमोडायनॅमिकली (अत्यंत) स्थिर होईपर्यंत तिची प्रकृत गंभीर होती, ” असे डॉ. विक्रम वाघ म्हणाले, “ती शॉकमध्ये होती. तिचा रक्तदाब ७०च्या पुढे नव्हता, त्यामुळे आम्हाला तिला आधार द्यावा लागला. त्यानंतर तिला व्हेण्टिलेटरवरून काढण्यात आले. ती शुद्धीवर आली आणि तिची प्रकृती काहीशी स्थिर झाली.
सरिता स्थिर झाल्यानंतर तिच्या स्किन ग्राफ्टिंग करण्यात आले. तिच्या आरोग्याच्या स्थितीनुसार प्रक्रिया करण्यात आल्या. सरिताची स्थिती स्थिर करण्यासाठी एक तास ते अडीच तासापर्यंत एकूण १४ प्रक्रिया करण्यात आल्या. प्रत्येक प्रक्रियेमध्ये तिचा काही प्रमाणात रक्तस्राव झाला, ज्यामुळे ती अशक्त झाली. तिचे आरोग्य खालावले आणि तिला अनेकवेळा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. ६ मोठ्या व उर्वरित लहान प्रक्रिया करण्यात आल्या. त्यात तिच्या कवटीला छिद्र पाडण्याचा समावेश होता. मज्जापासून पृष्ठभागापर्यंत रक्त बाहेर काढण्यासाठी हे केले गेले. रक्तातील स्टेम सेल नवीन ग्रॅन्युलेशन लेयर वाढण्यास मदत करते, ज्यामुळे स्किन ग्राफ्टिंगसाठी उत्तम मदत होते.
डॉ. विक्रम वाघ पुढे म्हणाले, “आम्ही प्रक्रिया केली असली तरी त्वचेचा संपूर्ण भाग पूर्ववत होण्यासाठी ६ महिने लागले असते. म्हणून आम्हाला तिच्यासाठी जर्मनीमधून स्किन आयात करावी लागली. कंपनीने दयाळूपणा दाखवत एक नमुना दिला, तसेच एका नमुन्याचे बिल देखील दिले. हा खर्च तिच्या मालकांनी आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने उचलला. इतर स्क्रिन ग्राफ्ट जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी स्किनचा वापर करण्यात आला. हळूहळू तिची प्रकृती स्थिरावली. शेवटी ती बरी झाली आणि स्किन तिच्या त्वचेशी सामावून जाण्याकरिता आम्ही तिला एक आठवडा सामान्यपणे जीवन जगण्यास सांगितले.” असेही डॉ. वाघ म्हणाले.