शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी करिता येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. याकरिता 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत एकूण 40 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये भाजप वतीने अश्विनीताई जगताप, राष्ट्रवादी वतीने नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह आम आदमी पार्टी वतिने मनोहर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज 8 फेब्रुवारी रोजी सर्व उमेदवारी अर्ज छाननी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. यामध्ये सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. यामध्ये आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांच्याही अर्जाचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पार्टी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार होती. परंतु आता त्यांच्या उमेदवाराचा अर्ज हा अवैध ठरल्याने आम आदमी पार्टी या निवडणुकीतून बाहेर फेकली गेली आहे. उमेदवारी अर्ज अपूर्ण भरला गेला, तसेच एबी फॉर्म हा अपूर्ण असल्याने आम आदमी पार्टीचे उमेदवार मनोहर पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.