शबनम न्युज | चिंचवड
प्रतिनिधी | गजाला सय्यद
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी करिता महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राहुल कलाटे यांची समजूत काढूनही कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. दरम्यान, काल शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) सचिन अहिर यांनी देखील त्यांची भेट घेऊन अर्ज मागे घेण्यास विनंती केली होती. परंतु कलाटे यांनी निवडणूक लढविण्यास ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आज राहुल कलाटे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील चाफेकर चौकात कट्टर शिवसैनिकांच्या वतीने फ्लेक्स बाजी करण्यात आली.
‘एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून.. नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी.. एकदम ओके डोक्यातून… खरा शिवसैनिक’ अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. या पोस्टरची चर्चा होत असतानाच हा पोस्टर आता काढण्यात आला आहे. राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरी संदर्भात हा पोस्टर लावल्याची चर्चा सुरु आहे. तर राहुल कलाटे यांनी आरोपांचे खंडन केले असून, “खरा शिवसैनिक असे फ्लेक्स लावूच शकत नाही”, असे म्हटले आहे. मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी ही स्टंटबाजी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा सोबतच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ही निवडणूक लढविणार आहे. याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.