संपादकीय | रेहान हुसेन
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक येत्या 26 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी वतिने स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, महाविकास आघाडी वतीने इच्छुक असलेले उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडी सोबत बंडखोरी करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तेही निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. सध्याची स्थिती पाहता महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा प्रचार आघाडीवर असून, महाविकास आघाडी मधील सर्व पक्ष हे पूर्ण ताकतीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारात उतरलेले आहेत. राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष व वंचित बहुजन आघाडी हे चारही पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा प्रचार करीत आहेत.
बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे या निवडणुकीत विठ्ठल उर्फ नाना काटे व भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. राहुल कलाटे यांना 2014 मध्ये स्व.लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवितांना 62 हजार मते पडली होती. तर 2014 मध्ये विठ्ठल नाना काटे यांना 42 हजार मते मिळाली होती. राहुल कलाटे हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार तर नाना काटे हे तिसऱ्या क्रमांकाचे जास्त मते घेणारे उमेदवार ठरले होते. 2019 मध्ये राहुल कलाटे यांनी युतीसोबत बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी स्व. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात त्यांना तब्बल 1 लाख बारा हजार मते मिळाली होती. त्यामुळे साहजिकच आपण दोन वेळा दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरलो असल्याने याही वेळी आपल्याला महाविकास आघाडी वतीने उमेदवारी मिळायला हवी होती, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 2019 मधील परिस्थिती पाहिली तर राहुल कलाटे यांना पुरस्कृत करणारे पक्ष राष्ट्रवादी हे त्यांच्यासोबत होते. तसेच शिवसैनिक, काँग्रेस ,वंचित बहुजन आघाडी या पक्षांचाही राहुल कलाटे यांनी पाठिंबा घेतला होता व या सर्व पक्षांच्या पाठिंब्यावरच राहुल कलाटे यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. परंतु आता महाविकास आघाडीतील या सर्व पक्षांचा पाठिंबा हा विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासोबत आहे. या निवडणुकीत राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार असून, त्यांना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, तसेच लोकभावना माझ्यासोबत जोडली गेली आहे, या एकाच मुद्द्यावर ते निवडणूक लढवीत आहेत. परंतु मागील निवडणूक वेळी सर्वपक्षीय पाठिंबा असल्याने त्यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळविण्यात यश आले होते. ते यश आत्ताही येणार, अशी त्यांची भावना आहे परंतु आता तसली परिस्थिती राहिली नाही. विठ्ठल उर्फ नाना काटे हे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवीत आहेत, ते राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे नक्कीच राहुल कलाटेंपेक्षा विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे पारडे सध्या जड आहे.
तसेच राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांची साथ मिळावी, यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपलाच उमेदवार म्हणजेच विठ्ठल उर्फ नाना काटे विजय होतील, अशी ही अपेक्षा वारंवार व्यक्त केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यावर आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीला सोपी जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराची धुरा प्रचार प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्याकडे सोपीविण्यात आली आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रभारी पदी मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके हे स्वतः विठ्ठल नाना काटे यांना विजयी करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन प्रचाराची दिशा ठरवत आहेत. तसेच निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता, त्यांच्या विरोधात असणारे राहुल कलाटे यांच्यासोबत तीन नगरसेवक आहेत . तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने राहुल कलाटे यांचा प्रचार करीत आहेत. परंतु सध्याची स्थिती पाहता विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे पारडे जड असून, राहुल कलाटे यांच्या पेक्षा जास्त मते नाना काटे यांना पडतील असा एक अंदाज आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने नुकतीच 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या सर्व प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची सभा तसेच रॅली आयोजित होणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेना वतीने जाहीर करण्यात आली आहे की, येत्या सोमवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे नाना काटे यांच्या प्रचारात सहभाग घेणारा असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी रॅली काढण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांचीही सभा आयोजित करणार असल्याचे यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले.
चिंचवड गावाचे ग्रामदैवत मोरया गोसावी महाराज यांच्या मंदिरात त्यांचे दर्शन घेऊन आज विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे मोठ्या संख्येने प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित होते.
विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षात पिंपळे सौदागर परिसरात झपाट्याने विकास केला आहे. पिंपळे सौदागर हे 14 वर्षे पूर्वीचे व आत्ताचे यात फार मोठा फरक जाणवतो. हा विकासात्मक फरक फक्त नाना काटे यांच्या प्रयत्नातून झाला असल्याचे जाणकारांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाना काटे यांना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक थोडीशी सोपी जाणार आहे.