शबनम न्यूज | चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची रंगत आता वाढत चालली आहे. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तस तसे पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारांना वेग आलेला आहे. आरोप प्रत्यारोपच्या फैरी झाडल्या जात आहेत. प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा संपन्न होत आहेत, कोपरासभा प्रचार, फेरी, नारेबाजी या माध्यमातून शहरात जशी प्रचाराची लाट सुरू आहे, जो तो उमेदवार चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास ‘माझ्याशिवाय दुसरा कोणीच करू शकणार नाही,’ अशा पद्धतीने प्रचार करत आहे. परंतु मतदार हा समजदार व शिक्षित तसेच समंजस आहे, त्यामुळे मतदार हा योग्य उमेदवारालाच आपले बहुमूल्य मत देणार यात शंका नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्व.लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे हे उमेदवार आहेत तसेच महाविकास आघाडी वतीने इच्छुक असलेले उमेदवार राहुल कलाटे यांनी या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवारी देऊन निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे.
स्व. लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मागील पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी आपल्या या कारकीर्दीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. या विकासाच्या जोरावर तसेच सहानुभूतीच्या लाटेवर अश्विनी जगताप या निवडणूक रिंगणात निवडणूक लढवीत आहेत.
महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहेत. नाना काटे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील पंधरा वर्षांपासून नगरसेवक पदाच्या माध्यमाने आपल्या पिंपळे सौदागर परिसराचा विकास करीत आहेत, पिंपळे सौदागर परिसराचा विकास हा मोठ्या प्रमाणात झाला असून नाना काटे यांनी 2014 मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक मध्ये स्व. लक्ष्मण जगताप यांची विरोधात निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. विकास कामांच्या मुद्द्यावरच ते आपली ही निवडणूक लढवीत आहेत. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघ व पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा राष्ट्रवादीनेच केला आहे, अजित पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा विकास झाला आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावरच नाना काटे निवडणूक रिंगणात आहेत.
राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची फौज तयार केली आहे. या स्टार प्रचारकांनी संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत नाना काटे यांचा प्रचार प्रभावी केला आहे. यामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हातात या प्रचाराची धुरा देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला व स्वतः राष्ट्रवादीचे आमदार झाले, असे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीचे नाना काटे यांना निवडून आणण्याचा चंग सुनील आण्णा शेळके यांनी बांधला आहे.
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हेही विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवीत आहेत त्यांनी 2014 व 2019 मध्ये स्व. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली व त्यांना कडवी झुंज दिली, चिंचवड विधानसभा मतदार संघातील जनतेच्या भावना या माझ्यासोबत असून, त्यांनी मागील दोन वेळा मला भरभरून मतदान केले आहे व याही वेळी जनतेच्या भावना माझ्याशी जोडल्या गेल्या असल्याने या लोकभावनेतूनच मी ही निवडणूक लढवीत असल्याचे राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश धुडकवून लावत राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप व राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या मतदानावर निश्चितच परिणाम होणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीत एकूण 26 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वरील तीन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता यामध्ये अपक्षांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक अपक्ष उमेदवार हा आपापल्या पातळीवर स्वतःचा प्रचार करीत आहेत, या प्रचारासाठी समाज माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. काही अपक्ष उमेदवार प्रचार फेरी काढत आहेत तर काहीं रिक्षांच्या माध्यमातून आपला प्रचार करत आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्व जाती धर्माचे मतदार वास्तव्यास आहेत, सदर मतदार संघ हा सुशिक्षित असून, येणारा काळ हा चिंचवड विधानसभा मतदार संघाचा आमदार कोण? हा ठरविणार आहे व हे ठरवीत असताना, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औत्सत्त्याचे ठरणार आहे. 26 फेब्रुवारी झालेल्या मतदानाचा निकाल हा दोन मार्च रोजी येणार आहे.
सर्वच उमेदवार आपला प्रचार हा प्रचंड तीव्रतेने करत असून प्रत्येक तळागाळाच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु मतदार राजा हा कोणाच्या बाजूने आपली मते भरपूर देतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. शेवटी मतदार हाच चिंचवड विधानसभा मतदार संघाचा आगामी आमदार कोण? हे ठरविणार आहे.