शबनम न्युज | पुणे
“कलाकाराच्या कलाकृतीला प्रोत्साहन व त्याला योग्य मोबदला मिळाला, तर तो आणखी चांगली निर्मिती करू शकतो. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन-पीआयएटी) आयोजित ‘ऑरा २०२३’ सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी शेखर गायकवाड बोलत होते. प्रदर्शनाचे हे १७ वे वर्ष असून, यंदा ‘शाश्वत विकासाची १७ ध्येये’ संकल्पनेवर हे प्रदर्शन होत आहे. टाकाऊ वस्तूंपासून या सगळ्या गोष्टी साकारण्यात आल्या आहेत, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव मोहम्मद शाहिद उस्मानी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष पवार, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, उद्योजक कल्याण तावरे, अध्यात्मिक समुपदेशक विद्यावाचस्पती विद्यानंद, ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गायकवाड यांनी ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांना साखर संकुलात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाच्या कामात सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.
टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी सदाशिव पेठेत असलेल्या ‘पीआयएटी’ संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन ३ मार्चपर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठीच्या वस्तू, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्लास्टिकमुक्त परिसर, सुंदर शहर, हरित शहर, ऊर्जेचे पर्याय, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध गोष्टी शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चिथारल्या आहेत.
शेखर गायकवाड म्हणाले, “कला क्षेत्राबद्दल समाजात म्हणावी, तशी जाणीव निर्माण झालेली नाही. कलेला वाव, पाठबळ दिले पाहिजे. कौशल्य विकास कार्यक्रमात अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना समाविष्ट करायला हवे. कल्पकतेला पैसे द्यावेत, ही भावना रुजायला हवी. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असतानाच कमावण्याची सवय लावणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या क्षेत्रात करिअर करताना आपला बी प्लॅन तयार ठेवायला हवा.”
मोहम्मद शाहिद उस्मानी म्हणाले, “हा अभ्यासक्रम शिकताना तांत्रिक बाबी पक्क्या होण्यावर भर दिला पाहिजे. समाजाला नेमके काय हवे, याचा विचार करून आपल्याला नाविन्यपूर्ण, कल्पक रचना निर्माण करता याव्यात. अभ्यासक्रमासोबतच प्रात्यक्षिक अनुभव घेण्याला प्राधान्य द्यावे. गटागटाने कंसल्टंसी सुरु करून त्यातून अर्थार्जन करता येऊ शकते.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “मुलांनी भरविलेले हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. पाठ्यक्रम शिकवण्याबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना स्वावलंबन, प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गेली १७ वर्षे मुलांच्या पुढाकारातून व कल्पकतेतून हे प्रदर्शन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यातून मुलांच्या प्लेसमेंट्स होतात.”
डॉ. सुभाष पवार म्हणाले, “माणसाने सतत नवनवीन गोष्टी शिकाव्यात, आत्मसात कराव्यात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर त्या क्षेत्रात सखोल ज्ञान घेतले पाहिजे. आपले काम उत्तम आणि इतरांपेक्षा वेगळे करण्यावर भर द्यावा. कलाकृती चांगल्या असतील, तर लोकांचा प्रतिसाद तितकाच उदंड मिळतो.”
कल्याण तावरे, विद्यावाचस्पती विद्यानंद यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रा. अजित शिंदे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका व प्रक्रिया सांगितली. मानवी जैन, आयुष पोकर्णा यांनी सूत्रसंचालन केले. दीपिका पटेल हिने आभार मानले. प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन पल्लवी पुरंदरे, अनिकेत नाईकरे, अमित जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.