शबनम न्युज | मुंबई
“विरोध आहे म्हणून आता काय मी त्यांचे गचुरे धरू, की मारामारी करू, म्हणजे मी विरोध केल्यासारखे दिसेल,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता दिली. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमानी विरोधी पक्षनेते अजित पवार विरोध करीत नसल्याचा प्रश्न विचारला होता. या पार्शवभूमीवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, विशिष्ट नेत्यांना तीव्र विरोध करत नाही, सॉफ्ट भूमिका घेतो असा आरोप केला जात आहे, हा आरोप मला मान्य नाही. मी सभ्यता पाळतो, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ती शिकवण आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, जेष्ठ नेते शरद पवार यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याचे काम केले. विरोध करून आता काय मी त्याचे गचुरे धरू की मारामारी करू, म्हणजे मी विरोध केल्यासारखे दिसेल, असे पवार म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही राजकीय जीवनात अनेकदा आरोप झाले. पण त्यांनी विकासावरच बोलणे सुरू केले. खैरनार यांच्यापासून अनेकांनी त्यांच्यावर आरोप केले. दाऊदशी संबंध जोडले, पप्पू कलानीचे नाव घेतले. एन्रॉनच्या बाबतीत नको तितकी बदनामी केली, मात्र पवार साहेबांनी त्यांचा तोल कधीच जाऊ दिला नाही. शेवटी लोक गोड फळे असणाऱ्या झाडालाच दगड मारतात. कडू फळे असणारा झाडाकडे पोपट सुद्धा जात नाही. मी माझ्या हाती असलेल्या संसदीय आयुधांचा वापर करत विरोधकांना कोंडीत पकडतो, त्यामुळे मी विरोधकांबाबत सॉफ्ट भूमिका घेतो, हा आरोप मला मान्य नाही. विधिमंडळात मी विरोधी पक्षनेता म्हणून अनेक विषयांवर आवाज उठवतो. इतर राज्यात विधानसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, खुर्च्या फेकणे, वाईट बोलने अगदी मारहाणी पर्यंतच्या घटना घडल्या आहेत. या पद्धतीने विरोध मला अजिबात मान्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नरच्या आरोपांना उत्तर दिले आहे.