शबनम न्युज | पुणे
कात्रज घाटात दुचाकी घसरल्याने दोन अल्पवयीन मुलं गंभीर जखमी झाले. दोघांकडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केली आहे. दोघेही अल्पवयीन असून ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली.
या प्रकरणी संतोष राजू पासवान (वय २१, रा. बेनकर वस्ती, धायरी) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात पासवान आणि त्याच्याबरोबर असलेली दोन अल्पवयीन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या बरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश काळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संताेष पासवान याच्यासह चौघे जण एकाच दुचाकीवरून जुन्या कात्रज घाटातून निघाले होते. कात्रज बोगद्यापासून काही अंतरावर दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने पासवान याच्यासह दोन अल्पवयीन मुले जखमी झाली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार तेथून पसार झाला. या सगळ्यांची गंभीर गुन्हा करण्याची तयारी असल्याची माहिती आहे. याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहे.