शबनम न्युज | मुंबई
“पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षातच नाही, असा अर्थ होत नाही. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जातेय. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचे काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी हे कुणी सांगायची गरज नाही.आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतला आहे, ते जनतेचं ऐकत असतात. वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. जो अध्यक्ष होईल तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आज शरद पवार राजकीय आत्मकथा ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना शरद पवारांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काही कार्यकर्त्यांनी उपोषणास बसण्याचे देखील सांगितले आहे. सर्वत्र शरद पवारांच्या या निर्णयावरून मत व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांच्या या निवृत्तीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
ते म्हणाले, “देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली पार्टी चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. कुणीही अध्यक्ष झालं तर साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे… नव्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील ना…आपण साहेबांनी हाक दिल्यावर येणारच…खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील.”, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समजावले.