शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पोलिसांना यश आले आहे. गणेश नंदू पवार (रा.इंद्रायणी नगर, भोसरी पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात भा.द.वि.कलम ३७६, ४९८, ३२४, ५०४, ५०६, ३४ तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणी नावे बदलून राहत असून, तो सध्या धुळे जिल्ह्यात राहण्यास आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळताच पथक तयार करून धुळे येथे हे पथक रवाना केले. धुळे जिल्हा शहर पोलीस ठाणे येथे जाऊन सदर पथकाने आरोपीस अटक केली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे, स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार बाळू कोकाटे, सोमनाथ बोराडे, अजित रुपनवर यांनी केली आहे.