शबनम न्युज | पुणे
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभूसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते.
ते म्हणाले, परकीय आक्रमणावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे, याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांनी ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमांची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला, उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.