पिंपरी, १९ मे २०२३ :- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले अशा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने उमेद जागर उपक्रम राबविण्यात येतो.
याअंतर्गत सिम्बॉयसिस ओपन स्किल युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत बेसिक व ॲडव्हान्स शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. व अश्या महीलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहे . त्यानंतर थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू करण्यात आलेले असून या ठिकाणी कोविड योध्दा महिला बचत गटातील महिला काम करीत आहेत. सद्यस्थितीत जुन्या कपड्यांपासून पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनवण्याचे काम चालू आहे.
तथापि या महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने सदर बचत गटासोबत सोबत ३ वर्षे करारावर सहा महिन्यांसाठी ५० हजार दरमहा याप्रमाणे खेळते भांडवल देण्यात येणार आहे. तसेच बचत गटाला शिलाई कामकाजाच्या ऑर्डर देण्यासाठी महापालिका मदत करणार आहे.
त्यापुढील भांडवल व खर्च महिलांनी करावयाचा आहे. महापालिकेकडून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते कोविड योध्दा बचत गट क्रमांक १ च्या अध्यक्षा सुवर्णा भालेराव,रंजना शेंडे,लता बवले, मीना चौधरी, कविता साबळे,,स्मिता अंकुशे, मंगल लोंढे यांना आज आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समाजसेवक संतोषी चोरगे,समूह संघटक रेश्मा पाटील,वैशाली खरात, मनोज मरगडे आदी उपस्थित होते.
कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे समाज विकास विभागाकडून समाज संघटक यांच्यामार्फत सर्वेक्षण
पिंपरी, १९ मे २०२३ :- कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे समाज विकास विभागाकडून समाज संघटक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते व अशा मुलांना उप आयुक्त अजय चारठाणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वसतिगृहामध्ये दाखल करण्यात आलेले होते. यामधील अंजली संजय मोरे, गौतम संजय मोरे,आणि अभिषेक संजय मोरे या तिळ्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे .या भावंडानी महापालिकेचे आभार व्यक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली यावेळी उप आयुक्त अजय चारठाणकर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच समूह संघटक वैशाली खरात उपस्थित होत्या.