शबनम न्युज | मुंबई
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, उत्तर देताना खासदार संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभरात अनेक पडसाद उमटले. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर अजित पवार आणि संजय राऊत यांमध्ये उत्तर-प्रत्युत्तरांची स्पर्धा सुरू होती. मात्र, काल ‘मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला’, असे बोलून संजय राऊत यांनी खेद व्यक्त करत माघार घेतली. त्यानंतर परत एकदा अजित पवारांना याविषयी प्रश्न विचारले गेले असता, अजित पवार म्हणाले, ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मी मनाला लावून घेत नाही, इतरांनी तरी ते कशाला म्हणायला लावून घ्यायचे’, या सर्व घटनेनंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावरून संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
शिरसाट म्हणाले, अजित पवारांनी काल एक खुट्टी ठोकली आणि तुमची भाषा बदलली. अजित पवारांनी तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत सांगितलं. तुम्ही मोठे नेते आहात, असं ते म्हणाले. याचा अर्थ असा होता की, तुमच्याबरोबर आता आम्हाला बोलणी करायची नाही. अजितदादांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवली म्हणून तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदललं.
संजय शिरसाट संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, तुम्हीच सांगितलं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आता तुमची जळून राख झाली आहे, त्यामुळे आता तरी तुम्ही सुधरा. दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा इतर विषयांवर बोला, शेतकऱ्यांच्या विषयावर बोला. तुम्ही शिवसेना नेस्तनाबूत केली आहे. आता ‘सामना’ (शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र) इतर पक्षांचं मुखपत्र झालं आहे. मी संजय राऊतला सांगेन बाबा रे तू उद्धव ठाकरेंना बुडवलं आहेस. उद्धव ठाकरे गटाची वाट लावली आहेस. तुझं काम आता संपलं आहे. त्यामुळे तुझी ही बडबड थांबव, अशी मी तुला विनंती करतो. असेही ते म्हणाले.