शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
नऊ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ११ फेब्रुवारी २०११ मध्ये ४० फूट रोड, हनुमान मंदिरासमोर, आळंदी देवाची, ता. खेड, पुणे जिल्हा येथे अमोल जानक येवले (वय १९, रा. आळंदी देवाची, खेड,पुणे) याची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील एक आरोपी फरार होता. नऊ वर्षा नंतर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अर्जुन रमेश पुके (वय २९, रा. इंद्रायणी पार्क पद्मावती रोड आळंदी), प्रशांत पुरुषोत्तम बोबडे (रा. गोळेगाव ,खेड, पुणे)तुकाराम केरबा नेटके, (रा. केळगाव, ता.खेड पुणे) तसेच त्यांच्यासोबतच एक महिला असे या घटनेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२, ३६०, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी अर्जुन न्यायालयात दिलेल्या ठराविक तारखेला हजर न राहिल्याने न्यायालयाने 2014 मध्ये त्याला फरार घोषित करून त्यास न्यायालयासक्षम हजर करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा स्वतःचे अस्तित्व लपवून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी राहत होता. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक 1458 आशिष बनकर व पोलीस नाईक 1674 सागर शेडगे यांना सदर आरोपी हा टाकळी कुंभकर्ण, जि. परभणी येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती मिळाली असता, दरोडा विरोधी पथक परभणी येथे जाऊन अर्जुन याला अटक केले.
सदर कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त माने, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अंबरीश देशमुख, आशिष बनकर, गणेश हिंगे, समीर रासकर, अमर कदम, सागर शेळके, विनोद वीर, राजेश कौशल्य, उमेश पुलगम, गणेश सावंत, नितीन लोखंडे, सुमित देवकर, राहुल खारगे सर्व दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली.