शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
महाराष्ट्रात तसेच पुणे शहरात मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या साथीने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे शहरात तब्बल साडेचार हजार नागरिकांना डोळे आले आहेत,अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
डोळे आलेले अनेक रुग्ण परस्पर मेडिकल मध्ये जाऊन औषधे घेतात, अनेक जण खाजगी क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरात डोळे आलेल्यांची संख्या साडेचार हजार पेक्षाही अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डोळे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, खबरदारी म्हणून महापालिकेने मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 3000 ड्रॉप्स पाठविले आहेत. डोळे आल्यावर नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मध्ये जाऊन औषधे घेऊ नयेत, अनेक नागरिक जुन्या पद्धतीने मेडिकल मधून लिंबोळ्या टाकून घरगुती उपाय करीत आहेत, पण हे योग्य नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळे तपासणी करून औषध घेणे आवश्यक असल्याचे पुणे महानगरपालिकेने सांगितले आहे.