शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे शहरातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलासह रस्त्याची विविध कामे पूर्ण झाली आहेत. या चौकातील मार्गाचे उद्घाटन शनिवार (दि. 12) ऑगस्ट रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची विविध कामांचे देखील लोकार्पण यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वीही या कामांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले, त्यामुळे हे काम रखडले त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील कोंडीत अडकावे लागले, त्यानंतर या कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या, त्यावर यशस्वीपणे मात करत हे काम पूर्ण झाले आहे.